आयटीआयनंतर रोजगार

उद्योगजगताला एका इंजिनीअरमागे दोन किंवा तीन डिप्लोमा होल्डर्स आणि सात ते आठ आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी सरकारतर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये म्हणजेच ‘आयटीआय’मध्ये विविध व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षे आणि तीन वर्षे मुदतीच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

प्रत्यक्ष कामाचा अनुभव :

विविध क्षेत्रांतील कंपन्यांना त्यांच्या शॉप फ्लोअरवर काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल कामगारांची आवश्यकता असते. या कंपन्यांमधील प्रचंड यंत्रणा लक्षात घेता, हे कामगार योग्यरीत्या प्रशिक्षित असणे आवश्यक ठरते. त्या दृष्टीने या विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित ट्रेडमधील मूलभूत विज्ञान, त्याच्याशी संबंधित मशिन्स व अन्य यंत्रणांचे बारकावे शिकविण्यात येतात. या मशिनरीचा वापर, देखभाल, दुरूस्ती यावर प्रशिक्षणात भर देण्यात येतो. ‘आयटीआय’च्या अभ्यासक्रमामध्ये प्रात्यक्षिकांवर जास्त भर दिला जात असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो.

पुढील शिक्षणाच्या संधी :

  • आयटीआयमधून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे पदविका व पदवी (मुक्त विद्यापीठ) घेण्यासाठी पात्र ठरू शकतात. \
  • आयटीआयनंतर विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो.
  • डिप्लोमा यशस्वीरीत्या पूर्ण करणारे विद्यार्थी इंजिनीअरिंगच्या पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतात.
  • पदवीनंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यास त्यानंतर पीएच.डी. करण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळू शकते.

रोजगार संधी :

  • वाढत्या जागतिकीकरणामुळे राज्यात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या येऊ लागल्या आहेत. या कंपन्यांकडून ‘आयटीआय’च्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे.
  • आयटीआयच्या अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञान आणि रोजगारक्षम कौशल्यांचाही समावेश केल्याने या कंपन्यांकडून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जात आहे.
  • या विद्यार्थ्यांना चांगल्या पगारासह जेवणा-खाण्याची सुविधा आणि वाहतुकीची व्यवस्थाही काही कंपन्यांकडून पुरविण्यात येते.
  • काही वर्षांच्या अनुभवानंतर विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसायही सुरू करता येतो.
  • आयटीआयमधील अभ्यासक्रमात प्रॅक्टिकलचा भाग अधिक असल्याने आयटीआयमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उद्योगजगताकडून मोठी मागणी आहे.
  • या विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यवसायानुसार किमान पाच ते वीस हजार रूपयांपर्यंतचे वेतन मिळते.
Posted in Career Opportunity t.