प्रशासकीय सेवा, संशोधन क्षेत्रात संधी

जीवन कसे जगावे, हे शिकवणाऱ्या कला शाखेत भाषेचा अभ्यास करता येतो. त्यातून विविध देशांच्या वकिलातीमध्ये संधी मिळू शकते. त्याचबरोबर संशोधनाचा पर्याय आहेच. प्रशासकीय सेवेत जाण्याचा पाया इथेच घातला जातो. कायदा, समाजसेवा, पत्रकारिता अशी विविध क्षेत्रे या शाखेतील अभ्यासाने खुली होतात.

………………………………………………………………….

समाजाच्या मानसिकतेचा अभ्यास

कला शाखेतील करिअर निवडताना कला म्हणजे काय, हे पाहावे लागते. कला शाखेमध्ये मानव्यशास्त्र, सामाजिक शास्त्र व भाषाशास्त्र असे उपविभाग पडतात. शास्त्र लोकांचे जीवन सुलभ करण्याचा प्रयत्न करते. वाणिज्य तुम्हाला व्यवहार शिकवते, तर कला तुम्हाला जीवन कसे जगावे हे शिकविते. या विभागात समाजाचा अभ्यास केला जातो. त्याच्या मानसिकतेचा अभ्यास केला जातो. त्यांच्या भाषेचा अभ्यास केला जातो. म्हणजेच जीवन जगण्यासाठी कला विभाग आवश्यक आहे.

स्पर्धा परीक्षांची पायाभरणी

यूपीएससी, एमपीएससी, जिल्हा निवड समिती यांसारख्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भारताचा/महाराष्ट्राचा इतिहास, राज्यशास्त्र, पंचायतराज, अर्थशास्त्र अशा विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्याची तयारी याच शाखेत होते. बारावीनंतर कला शाखेत अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

भाषाशास्त्राद्वारे असंख्य संधी

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर कला शाखेतील विद्यार्थी बी.ए. करताना विशेष विषय निवडतात. यासाठी मानव्य, सामाजिक व भाषाशास्त्रांचा पर्याय आहे. भाषाशास्त्रांमध्ये भारतीय भाषा व पाश्चात्त्य भाषा यांचा अभ्यास केला जातो. भारतीय भाषांत मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू, सिंधी, पाली, अर्धमागधी, कन्नड, संस्कृत, पंजाबी अशांसारख्या अनेक भाषांचा समावेश आहे. भाषाशास्त्रात पारंगत झाल्यानंतर शिक्षक, प्राध्यापक, भाषा संचालनालय, भाषातज्ज्ञ, दुभाषी, अनुवादक, भाषांतरतज्ज्ञ, कॉपीरायटर, माध्यम क्षेत्र, जाहिरात क्षेत्र, परदेशी वकिलाती अशा अनेक क्षेत्रांत नोकऱ्या  उपलब्ध असतात. त्याचबरोबर दूरचित्रवाणी क्षेत्रात पटकथालेखक म्हणूनही संधी मिळते.

सामाजिक शास्त्रे

मानव्य व सामाजिक शास्त्र विभागात इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, अर्थ, तत्त्वज्ञान, मानववंश, संख्याशास्त्र, पुरातत्त्व, नाणेशास्त्र अशा विषयांचा समावेश होतो. इतिहासाच्या अभ्यासातून पुरातत्त्वशास्त्र, उत्खनन, हेरिटेज अशा क्षेत्रांत संधी उपलब्ध होते.

आर्थिक क्षेत्रात योगदान

मानसशास्त्रात मानवी मनाचा वेध घेतला जातो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसशास्त्राला महत्त्वाचे स्थान आहे. चाइल्ड सायकॉलॉजी, क्लिनिकल सायकॉलॉजी, कौन्सिलिंग (समुपदेशन) अशी अनेक क्षेत्रे खुली आहेत. अर्थशास्त्राचेही सध्या महत्त्व वाढले असून, अनेक वित्तीय संस्थांत, शासनामध्ये, बँकेमध्ये व इतरत्र ठिकाणी संधी उपलब्ध होतात.

संशोधन, प्रसारमाध्यमे आणि उद्योगविश्व

बारावीनंतर विधी क्षेत्रात पाच वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याचबरोबर मुंबईमध्ये राज्य शासनाने एक विधी विद्यापीठ स्थापन केले आहे. तिथेही विधी क्षेत्रातील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रसारमाध्यम क्षेत्रात जाण्यासाठी तीन वर्षांचा बीएमएम (बॅचलर ऑफ मास मीडिया) हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. बीएमएम जाहिरातशास्त्र व पत्रकारिता या दोन विषयांत करता येते. समाजकार्य विभागात काम करण्यासाठी बॅचलर ऑफ सोशल स्टडीज हा अभ्यासक्रम आहे. सध्या उद्योगविश्वात ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ म्हणजेच सीएसआरमुळे प्रत्येक उद्योगाला त्यांच्या नफ्यातील काही टक्के रक्कम ही समाजकार्यास खर्च करणे बंधनकारक असल्यामुळे उद्योग क्षेत्रातही ही पदवी घेतलेल्यांना मोठ्या संधी आहेत. समाजकल्याण विभाग, हॉस्पिटल अशा विविध विभागांतही संधी मिळते. बी.ए., बी.एम.एम., बी.एस.डब्ल्यू. किंवा इतर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर यामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. यात संशोधनाच्या संधीही आहेत. या सगळ्या बाबींचा विचार करता कला शाखा नेहमीच महत्त्वपूर्ण राहिली आहे.

Posted in Career Opportunity.