इंजिनीअरिंग, मेडिकलनंतर आयआयटीकडेही विद्यार्थ्यांची पाठ!

मुंबई, वृत्तसंस्था : देशभरातील इंजिनीअरिंग आणि मेडिकलच्या अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहत असल्याची स्थिती असतानाच आता आयआयटीच्या जागाही रिक्त राहत असल्याचे समोर आले आहे. देशभरातील आयआयटीमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा कमी जणांनी प्रवेश घेतल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. नोकऱ्यांची कमतरता, परदेशात जाण्याचे वाढते प्रमाण, प्रवेश परीक्षेची काठिण्यपातळी ही यामागील काही मुख्य कारणे असल्याने आयआयटीला हा फटका बसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. देशभरातील २३ आयआयटीमधील एकूण १० हजार ९८८ जागांपैकी यंदा १२१ जागा रिक्त राहिल्या आहेत. गेल्यावर्षी रिक्त जागांची संख्या २६ होती. त्याआधीही जवळपास ५० जागा रिक्त होत्या.

अनेक आयआयटीमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविल्या जात नसल्याने ही वेळ आल्याचे बोलले जाते. त्याशिवाय, या कॉलेजांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईईसारख्या प्रवेश परीक्षेची काठीण्यपातळी जास्त असल्याने विद्यार्थी पात्रतेचे प्रमाणही कमी आहे. याशिवाय नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही आकडेवारी कमी झाल्याने साहजिकच प्रवेशावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. २०१५ मध्ये २.४६ लाख जणांनी ही प्रवेश परीक्षा दिली होती, तर २०१८ मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यातून केवळ १.६३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सध्या विद्यार्थ्यांचा कलही काही प्रमाणात बदलला असल्याने आयआयटीमधील प्रवेशाचे प्रमाण कमी झाल्याचे आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांनी सांगितले.

Posted in Career News.