स्वतंत्र ओबीसी विभागाची स्थापना

इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला असून, त्याला विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, असे नाव दिले आहे. सध्या या विभागाची सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत.

 • या नवीन विभागाकडे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील अनेक विषय हस्तांतरित केले असून, त्या संबंधीची अधिसूचनाही काढली आहे. त्यानुसार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी कार्यरत यंत्रणा व महामंडळे ही नवीन विभागाकडे वर्ग केली आहेत. या प्रवर्गांच्या कल्याणकारी योजनांसाठी समन्वय साधण्याचे कामही हा विभाग करेल.

 

 • इतर मागासवर्गीयांसाठी केंद्र सरकारने मंजूर केलेली अनुदाने या विभागाला मिळतील. चारही प्रवर्गांसाठी असलेली वसतिगृहे, आश्रमशाळा, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन, तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळा/निवासीशाळा, या प्रवर्गांसाठीच्या सहकारी गृहनिर्माण योजना, आंतरजातीय विवाह योजना, केंद्र व राज्य शासनाची शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, विद्यावेतन आणिव्यावसायिक प्रशिक्षण योजना ही कामे नवीन विभागामार्फत चालतील.

 

 • चारही प्रवर्गांसाठी स्वयंसेवी आणि अशासकीय संस्थांना अर्थसहाय्य आणि अनुदान देणे, या प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार प्रदान करणे ही कामेही नवीन विभागामार्फत चालतील.

 

 • या विभागासाठी पदनिर्मिती व आकृतीबंधास मंजुरी दिली असून लवकरच पूर्णवेळ अधिकारी व कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तोपर्यंत विभागाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सामाजिक न्याय विभागातील ३ सहसचिव, ५ अवर सचिव आणि ६ कक्ष अधिकार्‍यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.

देशात पाच महिन्यांत ६० वाघांचा मृत्यू

देशात गेल्या पाच महिन्यांत ६० वाघांचा मृत्यू झाला असून मृत्युमुखी पडलेल्या वाघांचे सरासरी वयोमान हे चार ते आठ वर्षे आहे. व्याघ्र संरक्षणाऐवजी पर्यटनालाच महत्त्व दिल्या जात असल्यामुळे १ जानेवारी ते २६ मे या १४७ दिवसांमध्ये ६० मृत्यू म्हणजे अडीच दिवसाला देशात एक वाघ मृत्युमुखी पडत आहे. वाघांच्या मृत्यूचा हा आकडा चिंताजनक आहे.

 

 • राज्यात नुकतीच झालेली पाणवठय़ांवरील व्याघ्र गणना आणि त्याच दरम्यान आलेला व्याघ्र गणनेच्या चवथ्या टप्प्याचा अहवाल बघितला तर देशात वाघांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याची आकडेवारी मांडण्यात आलेली आहे.

 

 • वाघांची संख्या वाढत आहे. हा व्याघ्र अभ्यासकांचा अहवाल असला तरी १ जानेवारी ते २६ मे या पाच महिन्यांच्या कालावधीत देशातील दहा राज्यांमध्ये ६० वाघांचा मृत्यू झालेला आहे.

 

 • मृत्युमुखी पडलेल्या वाघांचे वयोमान बघितले तर ते एक वर्षांपासून ते तीन वष्रे आणि चार ते आठ वष्रे या वयोगटातील वाघांचे सर्वाधिक मृत्यू झालेले आहेत.

 

 • मध्यप्रदेश व कर्नाटक या दोन राज्यात मागील पाच महिन्यांत सर्वाधिक प्रत्येकी १३ वाघांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली आहे. या राज्यांपाठोपाठ उत्तराखंडमध्ये ९ वाघांचे मृत्यू झाले आहेत.

 

 • जिम कार्बेट या व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक मृत्यूंची नोंद घेण्यात आलेली आहे. त्या पाठोपाठ महाराष्ट्रात आठ वाघांचे मृत्यू झाले.

 

 • वाघांच्या मृत्यूमध्ये सर्वाधिक धक्कादायक मृत्यू हा ‘जय’ या प्रसिध्द वाघाचा छावा श्रीनिवासन याचा मृत्यू आहे. शेतकऱ्याने शेतात लावून ठेवलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून श्रीनिवासनचा मृत्यू झाला. मात्र प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून शेतकऱ्याने शेतातच खड्डा खोदून वाघाचा मृतदेह पुरून टाकला.

 

 • महाराष्ट्रापाठोपाठ आसाममध्ये सात वाघांचा मृत्यू झालेला आहे. उत्तरप्रदेशात चार, तामिळनाडूमध्ये दोन तर छत्तीसगड, ओडिशा व केरळ या राज्यात प्रत्येकी एका वाघाच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली आहे.

 

 • केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय तसेच राज्याच्या वन विभागाकडून व्याघ्र संरक्षणाऐवजी व्याघ्र पर्यटनाला अवास्तव महत्त्व दिले जात असल्यामुळे आणि व्याघ्र संरक्षणाकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याची टीका वन्यजीव प्रेमी करीत आहेत.

आसाममध्ये लोहीत नदीवर देशातील सर्वात मोठा पूल

आसाममध्ये लोहीत नदीवर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठया पूलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण झाले. आसाम आणि अरुणाचल या दोन राज्यांना जोडणारा हा पूल आर्थिक क्रांती घडवेल आणि महासत्ता बनण्यामध्ये देशाला उपयोगी ठरेल. आसाम आणि अरुणाचलच्या जनतेला हा पूल एकत्र आणेल.

 • प्रसिद्ध गायक भूपेन हजारीका यांचे नाव पूलाला देण्याची घोषणा मोदींनी केली. या पूलामुळे शेतक-यांना लाभ होऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल तसेच २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आपल्या सरकारचे लक्ष्य आहे.
 • सध्या या दोन ठिकाणांचं अंतर पार करण्यासाठी तब्बल ६ तासांचा प्रवास करावा लागतो तो आता फक्त १ तासावर येणार आहे.शिवाय १६५ किमीचं अंतरही वाचणार आहे. ज्यामुळे दिवसाला १० लाख रुपयांचं इंधन वाचेल असा दावा सरकार करतं आहे.
 • चीन सीमेवर तातडीनं हालचाली करण्यासाठी, अवजड टँक आणि इतर शस्रांची जलदगतीनं वाहतूक करण्यासाठी हा पूल फायद्याचा ठरणार आहे.
 • या ठिकाणी तैनात असलेल्या लष्करी तुकडीला आसामच्या ढोलामधून अरुणाचलला जायचं असलं की नौकेतून प्रवास करण्यासाठी तासनतास घालवावे लागत.
 • सोबत अवजड वाहन असल्यास २५० किमी वळसा घालत १० तासांचा प्रवास करावा लागायचा. पण या पूलामुळे पूर्वोत्तर सीमेवर लष्कराला अधिक प्रभावीपणे काम करता येणार आहे.

पुलाची वैशिष्ट्यं

 • ढोला-सदिया ब्रम्हपुत्र पुलाची लांबी ९.१५ किलोमीटर आहे.
 • ब्रम्हपुत्र पुल वांद्रे-वरळी सी-लिंकपेक्षा ३० टक्के मोठा आहे.
 • आसामची राजधानी दिसपुरपासून ५४० किमी आणि अरूणाचलची राजधानी ईटानगरपासून ३००किमी लांब आहे.
 • तेजपुर जवळ असलेल्या कलाईभोमोरा पुल नंतर ब्रम्हपुत्रवर पुढच्या ३७५ किमी ढोलापर्यंत दूसरा पुल नाही आहे.
 • आत्तापर्यंत नदीच्या मार्गाने प्रवास करण्यासाठी होडीचा वापर करावा लागत होता.
 • ब्रम्हपुत्र पुल बनवायचं काम २०११मध्ये सुरू झालं होतं, तर पुलासाठी एकुण ९५० करोड खर्च झाला आहे.
 • एकुण १८२ खाबांवर हा पुल उभा आहे.
 • आसाम आणि अरूणाचल या दोन राज्यांना हा पूल जोडेल.
 • लोकांना प्रवास करण्यासाठी तसंच लष्कराला या पुलाचा खूप फायदा होणार आहे.
 • चीन सीमेपर्यंत प्रवास करण्यासाठी चार तासांचं अंतर कमी होणार आहे.

नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांचा राजीनामा

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी २४ मे २०१७ ला पदाचा राजीनामा विद्यादेवी भंडारी यांच्याकडे दिला. सत्तेत सहभागी असलेल्या नेपाळी काँग्रेसला पंतप्रधानपदावर संधी मिळावी यासाठी दहल यांनी राजीनामा दिला.

 • नऊ महिन्यांपूर्वीच माओवादी नेते पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड झाली होती.

 

 • नेपाळी काँग्रेस तसेच मधेशी पक्षांनी दहल यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिल्याने ते पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.

 

 • पाठिंबा देताना नेपाळी काँग्रेसने प्रचंड यांच्यासोबत करार केला होता. यानुसार २०१८ पर्यंत दोन्ही पक्षाच्या नेत्यांना पंतप्रधानपदावर संधी दिली जाणार होती. यानुसार पहिले दहल यांना संधी देण्यात आली होती.

 

 • नेपाळी काँग्रेसचे नेते शेर बहादूर देउबा यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा करण्यासाठी दहल यांनी राजीनामा दिला.

 

 • ६२ वर्षीय दहल हे नेपाळचे ३९ वे पंतप्रधान होते. प्रचंड हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते.

 

 • यापूर्वी २००८ साली प्रचंड हे पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. मात्र त्यांची ही कारकीर्द अल्पजीवी ठरली होती.

 

 • २००९ मध्ये तत्कालीन सेनाप्रमुखांना बरखास्त करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या मुद्द्यावरून लष्कराशी त्यांचे तीव्र मतभेद झाल्याने त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते.

जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल चिनाब नदीवर

काश्मीरमध्ये चिनाब नदीवर येत्या दोन वर्षांत आयफेल टॉवर्सपेक्षा उंच रेल्वे पूल बांधला जाणार आहे. काहीसा वक्राकार असलेला हा पूल बांधण्यासाठी ११०० कोटी रुपये खर्च येणार आहे व त्यात २४ हजार टन पोलाद वापरले जाईल, नदीपात्रापासून ३५९ मीटर उंचीवर तो असेल. ताशी २६० किलोमीटर वेगाने गाड्या त्यावरून धावू शकतील.  या पुलासाठी फिनलंड, जर्मनी येथील कंपन्यांनी सल्लागार म्हणून काम करण्याचे मान्य केले आहे.१.३१५ किलोमीटरचा हा पूल अभियांत्रिकीतील एक मोठा चमत्कार मानला जाईल.

 • हा पूल कटरामधील बक्कल व श्रीनगर येथील कौरी या दोन ठिकाणांना जोडणारा असेल.
 • उधमपूर-श्रीनगर- बारामुल्ला रेल्वे प्रकल्पातील कटरा व बनीहालच्या १११ किमी पट्टय़ाचा हा पूल एक भाग असणार आहे.
 • या पुलाची बांधणी आव्हानात्मक आहे व तो पूर्ण झाल्यावर अभियांत्रिकीतील चमत्कार वाटेल. हा पूल २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून त्यात निरीक्षणासाठी रोप वे असणार आहे.
 • हा पूल चीनमध्ये बेजपान नदीवर बांधलेल्या २७५ मीटर उंचीच्या शुइबाय पुलाचा विक्रम मोडणार आहे. यात पोलादाचा वापर केला जाणार असून ते उणे २० अंश सेल्सियस तपमान व ताशी २५० कि.मी. वेग सहन करू शकेल.
 • वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी त्यात संवेदक असतील व वाऱ्याचा वेग ताशी नव्वद किलोमीटर झाल्यास मार्ग तांबडा होऊन रेल्वे वाहतूक थांबवली जाईल.
 • यात ६३ मि.मी. जाडीचे स्फोट प्रतिबंधक पोलाद वापरले जाणार असून दहशतवादी हल्ल्यांचा धोका विचारात घेऊन ही उपाययोजना केली आहे.
 • त्याचे खांबही काँक्रिटचे असतील पण ते स्फोट प्रतिबंधक राहणार आहेत. धोक्याच्या परिस्थितीत प्रवाशांचे रक्षण करण्यासाठी ऑनलाइन सुविधांचा वापर केला जाणार आहे.

पूलाची वैशिष्टे.

 1. फिनलंड आणि जर्मनीमधील तज्ज्ञांची मदत
 2. कटरा आणि बनिहाल मार्गादरम्यान पुलाचे काम सुरू
 3. भूकंपप्रवण क्षेत्र आणि दहशतवाद्यांकडून घातपाताचा धोका असल्याने पूल बांधताना विशेष साहित्याचा वापर
 4. दहशतवाद्यांकडून घडविल्या जाणार्‍या संभाव्य स्फोटांमध्ये तग धरू शकणार्‍या ६३ मिमी. जाड विशेष तारांचा वापर
 5. पुलाच्या देखभालीसाठी रोप-वेचीही व्यवस्था
 6. लांबी :१.३१५किमी
 7. चिनाबवरील उंची :३५९ मीटर
 8. आयफेल टॉवरपेक्षा अधिक उंच :३५ मीटर
 9. पुलासाठीचा खर्च :१२ हजार कोटी
 10. १४०० कामगार कामाला
 11. पूल बांधणीसाठी लागणारे पोलाद :२४ हजार टन
 12. रुंदीचा दुपदरी मार्ग :१४ मीटर
 13. १५ वर्षे टिकणारा रंग दिला जाणार

‘नो क्यू’ अॅप, SBI

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये आता रांग लावण्याची आवश्यकता नाही. छोट्या कामांसाठी मोठमोठ्या रांगा लावण्याची गरज आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना भासणार नाही. स्टेट बँकेकडून ई-टोकन सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक नो क्यू (No Queue) या अॅपवरुन ई-टोकन घेऊ शकतात.

• या अॅपच्या माध्यमातून ग्राहक ई-टोकन घेऊन बँकेच्या निवडक शाखांमध्ये काही सेवांचा लाभ घेऊ शकतात.
• ई-टोकन असलेले ग्राहक त्यांना देण्यात आलेल्या क्रमांकानुसार काऊंटरवर जाऊन सेवा प्राप्त करु शकतात. एसबीआयच्या या नव्या अॅपचे लॉन्चिंग बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी मागील वर्षी केले होते. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे पेमेंट करावे लागणार नाही. हे अॅप पूर्णपणे मोफत आहे.
• ‘ग्राहकांचा अमूल्य वेळ वाचवण्यासाठी या अॅपची सुरुवात करण्यात आली आहे.
• या अॅपमुळे ग्राहकांना कमीतकमी वेळात आवश्यक ती सेवा मिळेल.
• ई-टोकनच्या माध्यमातून ग्राहकांना अॅपच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाच सेवा निवडू शकतात. कॅश डिपॉजीट, कॅश विड्रॉवल, चेक डिपॉजीट, डिमांड ड्राफ्ट, एनईएफटी/आरटीजीएस यासारख्या सेवांसाठी ग्राहक अॅपच्या माध्यमातून ई-टोकन घेऊ शकतात.
• ‘बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या लोकांबद्दलचे रिअल टाईम स्टेटस’ नो क्यू अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना समजेल. त्यामुळे ग्राहकांना घरी असताना किंवा ऑफिसला असताना बँकेतील काऊंटरवरील रांगेत नेमके किती लोक आहेत, याची माहिती मिळेल. त्यामुळे रांगेत फारशी गर्दी असताना ग्राहकांना बँकेत जाऊन त्यांचे काम कमी वेळात करता येईल.