मराठी व्याकरण

एमपीएससी, तलाठी, पोलीस शिपाई, ग्रामसेवक, लिपिक-टंकलेखक, जिल्हा परिषद भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा समान घटक आहे. या विषयाच्या अभ्यासाचे नियोजन समजून घेऊ…

अभ्यासक्रमाचे स्वरूप

मराठी विभाग अभ्यासाला घेताना सर्वप्रथम आयोगाने नमूद केलेला अभ्यासक्रम पाहू. त्यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वा्नप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे या घटकांचा समावेश होतो. आयोगाने दिलेल्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमाचे अधिक सखोल विश्लेषण केल्यास त्यामध्ये व्याकरण या उपघटकामध्ये वर्णमाला, शब्दांच्या जाती, काळ, संधी, प्रयोग, वाक्यप्रकार व रूपांतर, वाक्याचे पृथ्नकरण, शब्दशक्ती, शब्दसिद्धी, समास, अलंकार, विरामचिन्हे, शुद्धलेखन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, रस आणि पारिभाषिक शब्दांचा समावेश होतो.

मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण

कोणत्याही विषयाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आणि प्रश्नांची अभ्यासक्रमाशी योग्य सांगड घालणे क्रमप्राप्त ठरते. यावरून आपल्याला कोणत्या उपघटकावर अधिक भर द्यावा लागेल, कोणत्या घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा लागेल तसेच कोणत्या घटकांचे पाठांतर करावे लागेल याचा अंदाज काढता येतो. पेपर एकमध्ये मराठी या विषयावर एकूण १०० पैकी ६० प्रश्न विचारले जातात.

व्याकरण –

पेपर एकमधील मराठी या विभागामध्ये व्याकरण या उपघटकावर साधारणपणे ६० पैकी ४० ते ५० प्रश्न विचारले जातात. याचे सखोल विश्लेषण खालीलप्रमाणे करता येईल.

१. वर्णमाला (४ ते ५ प्रश्न) – यामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजने, आणि त्यांचे प्रकार, उदाहरणे तसेच अधिक खोलात जाऊन एकूण स्वर, एकूण स्वरादी, एकूण व्यंजने यांच्या आकडेवारीवर देखील प्रश्न विचारले जातात.

२. शब्दांच्या जाती (१२ ते १५ प्रश्न)  यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय या शब्दांच्या आठ जाती, त्यांचे प्रकार, विभक्ती, लिंग यांवर आधारित प्रश्न विचारले जातात.

३. काळ, संधी, प्रयोग, वाक्यप्रकार व रूपांतर, वाक्यपृथक्करण (१० ते १५ प्रश्न) – यामध्ये वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ, यांची उदाहरणे, त्यांच्या व्याख्या, एका काळातून दुसऱ्या काळामध्ये वाक्यांचे रूपांतर, संधी, संधीचे प्रकार, संधीची फोड, प्रयोग, प्रयोगाचे प्रकार, त्यांची उदाहरणे, प्रयोगानुसार वाक्य रूपांतर, अर्थावरून वाक्याचे प्रकार, विधानावरून वाक्यांचे प्रकार, तसेच क्रियापदावरून वाक्यांचे प्रकार, वाक्यांचे परस्पर रूपांतर, वाक्यपृथक्करण, यामध्ये उद्देश्य, उद्देश्य विस्तार, विधेय, कर्म, कर्मविस्तार, विधानपूरक, विधेय विस्तार, यावर आधारित प्रश्न विचारले जातात.

४. शब्दश्नती, शब्दसिद्धी (१० ते १५ प्रश्न) – यामध्ये शब्दांच्या श्नती, अभिधा, लक्षणा, व्यंजना, यांच्या व्याख्या आणि उदाहरणे तसेच सिद्ध शब्द ज्यामध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषीय शब्दांचा समावेश होतो. यांच्या व्याख्या व उदाहरणे याचबरोबर साधित शब्द ज्यामध्ये उपसर्गघटित शब्द, प्रत्ययघटित शब्द, अभ्यस्त शब्द, सामासिक शब्दांचा समावेश होतो यांच्या व्याख्या व उदाहरणांवर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.

५. समास, अलंकार (२ ते ५ प्रश्न) – यामध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुब्रीही समास या सामासांच्या मुख्य प्रकारावर तसेच त्यांच्या उपप्रकारांच्या उदाहरणांवर आणि सामासिक शब्दाच्या विग्रहावर प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर अलंकारामध्ये शब्दालंकार ज्यामध्ये अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, श्लेष अलंकार यांचा समावेश होतो तसेच अर्थालंकारामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, अपन्हुती, रूपक, अनन्वय, व्यतिरेक, ससंदेह, भ्रान्तिमान, अतिशयोक्ती, दृष्टांत, अर्थातरन्यास, स्वभावोक्ती, अन्योक्ती, पर्यायोक्ती, विरोधाभास, चेतनागुणो्नती, व्याजस्तुती, सार अलंकार यांची उदाहरणे तसेच व्याख्या यावर आधारित प्रश्नांचा समावेश असतो.

६. विरामचिन्हे, शुद्धलेखन (२ ते ४ प्रश्न) – यामध्ये लेखनविषयक नियम, व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द ओळखणे, शब्दाचे योग्य रूप, शुद्ध शब्द ओळखणे अशा स्वरूपाच्या प्रश्नांचा समावेश होतो.

 

म्हणी व वाक्प्रचार

या विभागावर साधारणपणे ४ ते ५ प्रश्न विचारले जातात. यामध्ये म्हणी व वाक्प्रचारांचे अर्थ, त्यांचा योग्य तो वाक्यात उपयोग यावर आधारित प्रश्न विचारले जातात.

उताऱ्यावरील प्रश्न

या विभागावर साधारणपणे ५ प्रश्न विचारले जातात. या विभागातील प्रश्नांची उत्तरे सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आकलनक्षमता सुधारली पाहिजे तसेच भरपूर वाचन आणि सराव यावर भर देणे अपेक्षित आहे. या परीक्षांमध्ये मराठी विषयाची तयारी करण्यासाठी भरपूर पाठांतर, योग्य तो परीक्षाभिमुख सराव आणि सराव चाचण्यांच्या माध्यमातून उमेवार अपेक्षित यश निश्चितच मिळवू शकतात.

Posted in IMPORTANT TOPICS.