स्मरणासह लिखाणाची गती वाढवा : प्रा. राजा आकाश

» ‘परीक्षा क्रॅक करा’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या टिप्स
               » स्वयम्, माय करिअर क्लब व कमला नेहरू महाविद्यालयाचे आयोजन

नागपूर : परीक्षेत पेपर सोडवताना अनेक विद्यार्थी वेळ अपुरा पडत असल्याची तक्रार करतात. मात्र अभ्यासाचे अचूक नियोजन केले तर स्मरणासह लिखाणाची गती वाढेल, असा सल्ला कन्सल्टंट सायकॉलॉजिस्ट प्रा. राजा आकाश यांनी दिला. माय करिअर क्लब, स्वयम् सामाजिक संस्था आणि कमला नेहरू महाविद्यालयाच्या वतीने सक्करदरा येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात रविवारी (ता. ४) ‘परीक्षा क्रॅक करा’ ही नि:शुल्क मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. दहावी, बारावी आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी स्वयमचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, अमर सेवा शिक्षण मंडळाचे सचिव अ‍ॅड. अभिजित वंजारी, स्मिता वंजारी, डॉ. स्मृती परमार, प्राचार्य डॉ. गौतम कांबळे, डॉ. प्रदीप दहीकर आदी उपस्थित होते.

प्रा. आकाश म्हणाले, मुले हुशार असली तरी परीक्षेच्या अतिरिक्त दडपणामुळे त्यांची कामगिरी खालावते. पेपरचा कालावधी साधारणतः तीन तासांचा असतो. मात्र विद्यार्थ्यांनी अडीच तासात पेपर सोडविण्याचा सराव केला तर त्याचा फायदा होऊ शकतो. अंतिम परीक्षेपूर्वी सराव पेपर्स सोडविण्यावर भर देऊन शिक्षकांकडून मूल्यांकन करून घेण्याच्या टिप्स त्यांनी दिल्या.

 

 

 

 

 

परीक्षा कालावधीत पुरेशी विश्रांती घ्यावी. सोबतच आवडता खेळ खेळल्याने अथवा छंद जोपासल्याने मनावरील अभ्यासाचा ताण कमी होतो. पेपरच्या आदल्या दिवशी पुरेशी झोप घेतल्यास मेंटल एनर्जी साठविता येते. याचा पुरेपूर फायदा परीक्षेदरम्यान स्मरणासाठी होतो. जे काही वाचले, ते पूर्ण वेळेवर आठवेल, अशा सकारात्मक सूचना मेंदूला देण्याचा उपदेश त्यांनी केला. पेपर नीट अ‍ॅण्ड क्लीन असेल, हस्ताक्षर सुंदर असेल, उत्तरांची सुरुवात प्रभावीरीत्या केली तर जास्तीत जास्त गुण मिळण्याची शाश्वती त्यांनी व्यक्त केली. पालकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे दडपण न देता त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे त्यांनी सांगितले.

विशाल मुत्तेमवार यांनी, परीक्षाकाळात पालकांनी विद्यार्थ्यांना मानसिक बळ देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता आणि आवड लक्षात घेऊन पालकांनी निकालाचा स्वीकार करावा, असे ते म्हणाले. अ‍ॅड. अभिजित वंजारी यांनीही यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यशाळेला पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन प्रा. काशीकर यांनी केले, तर राहुल खळतकर यांनी आभार मानले.

Posted in EVENTS.