नॅक मान्यताप्राप्त महाविद्यालयांच्याच विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती !

नागपूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळावी, याकरिता आता कॉलेजेसना नॅक मान्यता मिळविण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ज्या कॉलेजेसनी नॅकमार्फत मूल्यांकन केले असेल, अशाच संस्थांमधील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. २०१९-२०च्या शैक्षणिक सत्रापासून ही अट लावण्यात येणार आहे. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने याबाबतच्या सूचना जाहीर केल्या आहेत.

डीबीटी संकेतस्थळाच्या घोळामुळे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती यंदा ऑफलाइन पद्धतीने करण्यात येते आहे. ही शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे. विविध शिक्षण संस्थांमध्ये निरनिराळ्या अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. उच्चशिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांनुसार, कॉलेजेसना नॅक मूल्यांकन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या संस्था मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन करण्यास पात्र ठरल्या आहेत, अशा संस्थांना २०१८-१९च्या सत्राअखेरपर्यंत आपले मूल्यांकन करून घ्यावे लागणार आहे. शैक्षणिक सत्र २०१९-२०पासून ज्या संस्था नॅक मूल्यांकन प्राप्त असतील अशाच संस्थांमधील विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यामुळे कॉलेजेसना नॅक मूल्यांकन करण्याचे बंधन येणार आहे.

दरम्यान, ऑनलाइन प्रणाली बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून सध्या ऑफलाइन म्हणजेच लेखी पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येत आहेत. २०१७-१८या वर्षाकरिता हे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन अर्ज भरून घेण्याचा निर्णय बराच उशिरा घेण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि त्यानंतरची प्रक्रिया पार पाडण्यासाठी कॉलेजेसना फारच कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे, विद्यार्थी आणि कॉलेजस अशा दोघांचीही धावपळ उडाली आहे.

Posted in Career News.