कला शाखेतील करिअरचे पर्याय

दहावीनंतर १२वीपर्यंत कला शाखेतून शिक्षण घेऊन पुढे करिअरचे अनेक पर्याय खुले होतात. भाषेवर प्रेम आणि प्रभुत्व असणाऱ्या मुलांनी विचार करावा अशा काही क्षेत्रांचा आढावा घेऊ…

 प्रकाशन व्यवसाय :

साहित्याची, पुस्तकांची आवड आणि भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या मुलांना प्रकाशन व्यवसायात चांगले करिअर करता येईल. साहित्यिक, शैक्षणिक, मनोरंजनात्मक प्रकाशने असे प्रकाशनांचे काही प्रकार आहेत. येथील संपादकीय किंवा मजकूर (कंटेंट) विभागात नोकरी हा उत्तम पर्याय होऊ शकतो. मात्र तपशिलात जाऊन काम करण्याची क्षमता ही या क्षेत्राची माफक अपेक्षा असते. पत्रकारिता, तसेच कोणत्याही भाषेतील साहित्याची पदवी असलेल्यांना साहित्यिक प्रकाशनांत नोकरी करता येते, तर शैक्षणिक प्रकाशनांत संबंधित विषयाची (कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचा कोणताही विषय) पदवी असल्यास नोकरी मिळू शकते. येथे मजकूर लेखन, संपादन, मुद्रितशोधन यांसारखे काम करता येते.

 पत्रकारिता, जनसंपर्क, संवादकौशल्य :

भाषा, सामान्य ज्ञान, चालू घडामोडींची उत्तम माहिती, चांगले संवादकौशल्य असणाऱ्या मुलांनी या क्षेत्राचा विचार करावा. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, मासिके, रेडिओ   . क्षेत्रांत रस असणाऱ्या मुलांना १२वीनंतर बीएमएम हा डीग्री कोर्स करता येईल किंवा पदवीनंतर मास्टर्स तसेच डिप्लोमा कोर्सचाही पर्याय यात उपलब्ध आहे. याच कोर्समध्ये जनसंपर्क मोड्युलचाही समावेश असतो. तसेच निव्वळ जनसंपर्क (पब्लिक रिलेशन) डिप्लोमा कोर्सेसही उपलब्ध आहेत. याचं शिक्षण घेतल्यास विविध कंपन्यांत जनसंपर्क अधिकारी तसेच कॉपोर्रेट कम्युनिकेशन अधिकारी म्हणूनही कामाची संधी मिळते.

 विदेशी भाषा :

जर्मन, फ्रेंच, चिनी भाषा अवगत करण्याकडे मुलांचा कल वाढतो आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांतून तसेच खाजगी संस्थांमधून यांचे कोर्सेस चालतात. अनुवादक, भाषांतरकार, व्हिसा आॅफिसमधील पदे, भाषा शिक्षक इ. नोकऱ्या याद्वारे मिळवता येतात. यासाठी इंग्रजी तसेच भाषाशास्त्राचे चांगले ज्ञान असावे लागते.

 कायदेशिक्षण :

कला शाखेतून १२ वी उत्तीर्ण झाल्यावर कायदेशिक्षणाचा चांगला पर्याय आहे. उत्तम तर्कबुद्धी, संवादकौशल्य आणि सूक्ष्मनिरीक्षण क्षमता असणाऱ्या मुलांना या क्षेत्राकडे वळता येईल. एलएलबी पासून सुरुवात केल्यास सॉलिसिटर पर्यंत व्यावसायिक टप्पे गाठता येतात. सरकारी, खासगी संस्थांमधून हे शिक्षण घेता येते.

बीएसडब्ल्यू :

सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या तसेच यात करियर करण्याची इच्छा असणाऱ्या मुलांसाठी हा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी १२वीनंतर प्रवेश देणाऱ्या अनेक संस्था मुंबईत असून, याद्वारे विविध सामाजिक संस्थांमध्ये नोकरी मिळवता येते.

याव्यतिरिक्त फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग, अ‍ॅनिमेशन व ग्राफिक डिझायनिंग यांसारखे निव्वळ कलेचे मार्गही तुमच्या कल्पकतेला वाव देऊ शकतात.

Posted in ARTS, Courses a.