पुढील वर्षी होणार्‍या एमपीएससी परीक्षांच्या तारखा जाहीर

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2018 मध्ये घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पुढील वर्षी होणार्‍या परीक्षांमध्ये राज्य कर (विक्रीकर) निरीक्षक परीक्षा 2017 साठीची पूर्व परीक्षा 16 जुलै 2017 रोजी घेण्यात आली होती. आता या पदासाठीची मुख्य परीक्षा रविवार 7 जानेवारी 2018 रोजी घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. राज्य सेवा परीक्षा 2018 साठीची जाहिरात डिसेंबर 2017 मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा रविवार 8 एप्रिल 2018 रोजी तर मुख्य परीक्षा 18 ते 20 ऑगस्ट, 2018 अशी तीन दिवस घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षेसाठी जानेवारी 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा 6 मे 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2018 अंतर्गत संयुक्त पेपर क्रमांक 1- 26 ऑगस्ट 2018 रोजी, पेपर क्र. 2 (पोलीस उपनिरीक्षक)- 2 सप्टेंबर 2018, पेपर क्रमांक 2 (राज्य कर निरीक्षक)- 30 सप्टेंबर 2018, पेपर क्र. 2 ( सहायक कक्ष अधिकारी)- 6 ऑक्टोबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2018 साठी फेब्रुवारी 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असून पूर्व परीक्षा 13 मे 2018 रोजी तर मुख्य परीक्षा 8 सप्टेंबर 2018 रोजी घेण्याचे नियोजित आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2018 साठी फेब्रुवारी 2018 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून पूर्व परीक्षा 20 मे 2018 रोजी तर मुख्य परीक्षा 9 सप्टेंबर 2018 रोजी घेण्यात येणार आहे.