बँक, रेल्वे, एसएससीसाठी एकच सीईटी!

नागपूर : बँका, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) पदभरतीदरम्यान स्वतंत्ररीत्या पूर्व आणि मुख्य परीक्षा आयोजित केल्या जातात. मात्र, यापुढे या भरतीसाठी एकच पूर्वपरीक्षा (सीईटी) होणार आहे. केंद्राच्या अखत्यारीतील कार्यालयांमध्ये गट ब अराजपत्रित आणि त्याखालील पदे भरण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एकत्र ही परीक्षा आयोजित केली जाईल. मुख्य परीक्षा मात्र स्वतंत्रपणे त्या-त्या संस्थांनी घ्यायच्या आहेत. यात मिळालेले गुण दोन वर्षांसाठी पात्र असतील. म्हणजे एकदा सीईटी दिल्यानंतर नंतरच्या दोन वर्षांत निघणाऱ्या जागांमध्ये विद्यार्थ्याला निवडीची संधी मिळेल. या प्रक्रियेची सुरुवात २०१९ पासून होणार आहे.

केंद्राच्या अंदाजानुसार, सध्या जवळपास पाच कोटी विद्यार्थी या परीक्षा वर्षभर देतात. त्यामध्ये एकसमानता येणे गरजेचे आहे. कारण, स्वतंत्ररीत्या पूर्वपरीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन आणि खर्चाची तरतूद करावी लागते. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अशा स्वरूपाच्या बदलाचे सूतोवाच केले होते. राज्यसभेतही नुकतीच १४ मार्चला या विषयावर चर्चा झाली. परीक्षा पद्धतीत बदलाच्या अनुषंगाने २०१४ मध्ये केंद्राने आय. एम. जी. खान यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तिचा अहवाल, गेल्या काही वर्षांत एसएससीच्या परीक्षांमध्ये वाढलेले गैरप्रकार आणि महिनोन्महिने चालणाऱ्या प्रक्रियेतील वेळ, पैसा वाचविण्यासाठी केंद्राने नवा पर्याय स्वीकारला आहे.

नोंदणीसाठी ‘नॅशनल करिअर सर्व्हिस’ पोर्टल :

सीईटी (पूर्वपरीक्षा) घेण्याची जबाबदारी सुरुवातीला स्टाफ सिलेक्शन कमिशनकडे राहील. यासाठी केंद्र सरकार ‘नॅशनल करिअर सर्व्हिस’ नावाचे पोर्टल तयार करेल. विद्यार्थ्यांना त्यावर नोंदणी करणे बंधनकारक राहील. हे पोर्टल प्रत्येक विद्यार्थ्याला एक युनिक आयडी देणार आहे. सुरुवातीच्या काही वर्षांत परीक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्येच होईल. कालांतराने मूल्यमापन करून घटनेच्या आठव्या परिशिष्ठात नमूद असलेल्या भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. शिवाय सीईटीत उत्तम गुण मिळविणारे विद्यार्थी संबंधित राज्य सरकारची कार्यालये, सार्वजनिक उद्योगांमधील रिक्त जागांसाठी पात्र राहतील.

असे असेल नवे स्वरूप :

  • दोन टप्प्यांत होईल परीक्षा
  • टीयर-१ मध्ये एसएससी, रेल्वे, बँक पूर्वपरीक्षा
  • सीईटीसाठी पेपरचे तीन स्तर राहतील
  • टीयर-२ हा मुख्य परीक्षेचा टप्पा (ही परीक्षा स्वतंत्रपणे होणार)
  • एसएससी, बँकांसाठी आयबीपीएस परीक्षा
  • रेल्वेसाठी रेल्वे भरती बोर्ड आवश्यकतेनुसार परीक्षा

 

Posted in Career News.