रेल्वेभरती परीक्षेत वेळेचे नियोजन, अचूकता महत्त्वाची

» मार्गदर्शन कार्यशाळेत अभ्यासाबाबत तज्ज्ञांच्या टिप्स
             » माय करिअर क्लब, स्वयम् आणि महाराष्ट्र टाइम्सचे आयोजन

नागपूर : रेल्वे म्हटली की वेळ आणि अचूकता यांचे घनिष्ट नाते आहे. ही अचूकता आणि वेळेच व्यवस्थापन रेल्वे भरती परीक्षेत उमेदवारांनी साधल्यास नोकरीची हमखास शाश्वती असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. रेल्वे विभागात सुरू असलेल्या विविध श्रेणींतील पदभरतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी माय करिअर क्लब, स्वयम् सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने रेल्वेभरती मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन रविवारी (ता. २५) क्रीडा चौकातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. या वेळी इच्छुक उमेदवारांनी हाउसफुल्ल गर्दी करीत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

या वर्षी विभागाने ८९ हजार ४०९ पदांसाठी महाभरती सुरू आहे. याबाबत सेंट्रल रेल्वेचे सेफ्टी कौन्सिलर एच. एस. रघुवंशी यांनी व्यवस्थापन आणि विविध पदांचे कार्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सर्वाधिक पदे ग्रुप-डी मध्ये असून यासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करू शकतो, असे ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.

 

 

रेल्वे महाभरती – विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी :

प्रास्ताविक करताना स्वयम् सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी, शासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प असल्याची खंत व्यक्त केली. वैदर्भीयांचा टक्का वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची कास धरायला हवी, असे ते म्हणाले. रेल्वेने या वर्षी जाहीर केलेली महाभरती विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुत्तेमवार यांनी केले.

परीक्षेत प्रत्येक सेकंदाला महत्त्व :

रेल्वेमधील पदभरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा १०० गुणांची असली तरी यामध्ये प्रत्येक सेकंदाला महत्त्व असल्याचे लॉजिक स्टडी सर्कलचे संचालक अशोक राऊत म्हणाले. राऊत यांनी कार्यशाळेत गणित विषयामधील टू लाइन मेथड विथ शॉर्ट ट्रिक्स समजावून सांगितलीे. गणिताबद्दलची असलेली भीती दूर सारत प्रत्येक सेकंदाला महत्त्व देण्याचा सल्ला त्यांनी दिला. कॉम्प्युटर बेस टेस्ट, फिजिक एफिशिअन्सी टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन अशा तीन टप्प्यांमध्ये परीक्षा आहे. तर गणित, सामान्य विज्ञान आणि रिझनिंग या चार विषयांना प्रत्येकी २५ गुण असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेत पंकज नरांजे यांनी जीएस आणि जीए याबाबत मार्गदर्शन केले. संचालन करिअर मोटिव्हेटर राहुल खळतकर यांनी केले.

Posted in EVENTS.